ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 6 - कथित गोरक्षकांनी तस्कर म्हणून ज्याची हत्या केली तो तस्कर नव्हे तर दुग्धउत्पादक शेतकरी होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेहलू खान यांना गाईंची तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली काही जणांकडून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेहलू खान यांच्यासहित एकूण पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी मारहाण करणा-यांचं समर्थन केलं असून त्यांचा गोरक्षक म्हणून उल्लेख केला आहे. या घटनेसाठी त्यांनी पीडितांनाच जबाबदार धरलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पेहलू खान यांना एक दुधाळ म्हैस विकत घ्यायची होती. दुग्धउत्पादक शेतकरी असल्याने रमजान महिन्यात दुध उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण पेहलू खान यांना विक्रेत्याने त्यांच्यासमोर एका गाईचं 12 लिटर दूध काढून दाखवलं, आणि त्यांनी ती गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. विक्रेत्याने माफक किंमत सांगितल्याने पेहलू खान तयार झाले आणि ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.
पेहलू खान यांचा मुलगा इरशादही त्यादिवशी दुस-या पिकअप ट्रकमधून प्रवास करत होता. त्या ट्रकमध्ये दोन गाई आणि वासरं होती. "वडिलांना गाडीतून खेचून बाहेर काढत मारहाण करण्यात आली. त्यांना काठ्या, पट्ट्याने मारहाण सुरु होती. त्यांच्यासोबत इतर चौघांनाही मारण्यात आलं", असं इरशाद सांगतो. "घटनेनंतर अर्ध्या तासाने पोलीस पोहोचले", असल्याचा आरोप इरशादने केला आहे. तोपर्यंत वडिल पुर्णपणे बेशुद्द झाले होते.
पेहलू खान हरियाणाचे रहिवासी आहेत. पशु मेळामधून त्यांनी या गाईंना विकत घेतलं होतं. त्यांनी कागदपत्रं सादर करुनही त्यांना मारहाण करण्यात आली. गाडीतून बाहेर खेचून, पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्या पिक अप व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी आपले वडिल आणि इतरांकडील 35 हजारही लुटून नेण्यात आल्याचा आरोप इरशादने केला आहे.
दामोदर सिंग नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गाईंची कत्तलीसाठी अवैध वाहतूक केल्याचा गुन्हा पीडितांविरोधात दाखल केला आहे. तसंच पेहलू खान आणि त्यांच्या मित्रांकडे असा कोणताच पुरावा नसल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी मारहाण करणा-यांचं समर्थन केलं असून त्यांचा गोरक्षक म्हणून उल्लेख केला आहे. या घटनेसाठी त्यांनी पीडितांनाच जबाबदार धरलं आहे. "दोन्ही बाजू चुकीच्या आहेत. गाईंची तस्करी बेकायदेशीर आहे माहित असतानाही ते करत होते. गोरक्षकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सामील झालेल्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं", म्हणत गुलाब चंद कटारिया यांनी मारहाण करणा-यांना एका अर्थी पाठिंबाच देऊन टाकला. पाठिंबा देताना "अशाप्रकारे कायदा हातात घेणं चुकीचं असून पोलीस कारवाई करतील", असंही ते बोलले आहेत.