- शीलेश शर्मा नवी दिल्ली : स्थलांतरितांच्या वेदनांचा आकांत केंद्र सरकार वगळता संपूर्ण देशाने ऐकला. सरकारने तिजोरी खुली करून कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे हैराण झालेल्यांना मदत करावी. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे देश रोजी-रोटीच्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. तहान-भुकेची पर्वा न करता लाखो मजुरांना हजारो मैल पायपीट करीत घराची वाट धरण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असे विदारक दृश्य सर्वांनी पाहिले.
या मजुरांचे दु:ख आणि व्यथा सर्वांनी ऐकल्या; परंतु सरकारला ऐकू गेल्या नाहीत, अशा धीरगंभीर शब्दांत सरकारवर हल्ला करीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रत्येक गरजू कुटुंबाला पुढच्या सहा महिन्यांसाठी दरमहा साडेसात हजार रुपये देण्याची आणि त्यापैकी १० हजार रुपये तात्काळ देण्यासोबत सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली.
सोशल मीडियावरून काँग्रेसतर्फे सुरू करणाऱ्यात आलेल्या ‘स्पीक अप इंडिया’ अभियानातहत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सरकारवर हल्ला चढविला. सोशल मीडियावर काँग्रेसने जारी केलेल्या व्हिडिओ फितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दु:खी पीडितांच्या व्यथेची पर्वा न करता झोपले असल्याचे दाखविण्यात आले आहे. गरीब, मजूर आणि छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
कर्ज नव्हे, आर्थिक मदतीची गरज -राहुल गांधी
आजघडीला देशाला कर्जाची नव्हे, तर आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा सरकारने गरिबांच्या खात्यात सहा महिन्यांसाठी दरमहा ७,५०० रुपये जमा करावेत. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्रासाठी आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप इंडिया’ अभियानातहत सोशल मीडियावर जारी केलेल्या एका व्हिडिओतून केली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. मजुरांना उपाशीपोटी पायपीट करावी लागत आहे. देशाला कर्जाची नाही, तर आर्थिक मदतीची गरज आहे. मनरेगातहत दोनशे दिवस रोजगार द्यावा, मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी तात्काळ व्यवस्था करावी आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाला तात्काळ एक पॅकेज द्यावे.
महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयत्न -प्रियांका गांधी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. आजच्या संकटाच्या काळात राजकारण करू नये. सहकार्य करण्याऐवजी तुम्ही सरकार पाडण्याचा, अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहात.
आज जनता त्रस्त आहे. एक मुलगा वडिलांना बैलगाडीत बसवून गाडी ओढत आहे. एक मुलगी वडिलांना सायकलवर बसवून गावी जाते. एका मातेचा मृतदेह रेल्वेच्या फलाटावर पडला असून, तिचा चिमुकला मुलगा तिला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांत लोक मरण पावत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लोकांसाठी आज काँग्रेसचे कार्यकर्ते आवाज उठवीत आहेत.