नवी दिल्ली - अयोध्या राम जन्मभूमी वादविवाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल न करण्याचा सुन्नी वक्फ बोर्डाने निर्णय आज घेतला आहे. त्यामुळे आता अयोध्येत कुठल्याही वादाशिवाय राम मंदिर होण्याचा होण्याचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे.काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये झालेल्या बैठकीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने अयोध्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करणार असे सांगितले होते. यावरून सुन्नी वक्फ बोर्डाच्या सदस्यांमध्ये मतभेद होते. फेरविचार याचिका दाखल करावी असे काही सदस्यांना वाटत होते. यामुळे मुस्लिम समाजात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह मुस्लिम समाजातील १०० मान्यवरांनी आपल्या सह्यांसह निवेदन देऊन फेरविचार याचिकेला विरोध दर्शवला होता. या याचिकेमुळे मुस्लिम समाजाचे नुकसानच होईल, अशी भीती मान्यवरांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली होती. गेल्या अनेक वर्षांच्या कटू अनुभवातून आपण काहीच शिकलो नाही का, असा प्रश्नही मान्यवरांनी केला होता. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डाची आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. अध्यक्षांसह बोर्डाचे आठ पैकी सात सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्यात फेरविचार याचिका दाखल न करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
राम मंदिर होण्याचा मार्ग मोकळा; सुन्नी वक्फ बोर्डाने फेरविचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 9:35 PM
आता अयोध्येत कुठल्याही वादाशिवाय राम मंदिर होण्याचा होण्याचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे.
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल न करण्याचा सुन्नी वक्फ बोर्डाने निर्णय आज घेतला आहे.या याचिकेमुळे मुस्लिम समाजाचे नुकसानच होईल, अशी भीती मान्यवरांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली होती.