नवी दिल्ली - सरकारी नियमानुसार सध्या नागरिकांसाठी बँकांचे कार्यालय खुले होण्याची वेळ सकाळी 10 वाजताची आहे. पण, लवकरच या वेळांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार या वेळांत बदल करण्यात येत आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या बँकींग विभागाने सर्वच सरकारी आणि ग्रामीण भागातील सहकारी बँकांनी सकाळी 9 वाजताच बँक खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची वेळ एकच असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे. गेल्या जून महिन्यात यांदर्भात बँकींग विभागाने बैठकही घेतली होती. त्यामध्ये, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँका उघडण्याची वेळ ठरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
भारतीय बँकिंग असोसिएशनने ग्राहक सुविधांसाठी गठित केलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँक उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे तीन प्रस्ताव दिले होते. त्यानुसार, सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. दुसरा सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आणि तिसरा पर्याय सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा वेळांत बँक ग्राहकांसाठी खुली करावी. त्यानंतर, सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेबाबत निश्चित करण्यात आल्याचे समजते. तर, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावलीनुसार बँका सुरू होतील, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. याबाबतची सर्वच सरकारी प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ जिल्हास्तरावरील समन्वय समित्यांनी तीनपैकी एक वेळ निश्चित करायचा आहे.