जेरुसलेम : भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २३० प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. हे विमान शुक्रवारी सकाळी भारतात पोहचेल. या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे.
तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने युद्धादरम्यान भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते भारतीय कंपन्यांसोबत ऑनलाइन बैठका घेत आहेत, ई-मेलद्वारे भारतातील विमानांची माहिती पाठवत आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.
येथे भारतीय परिचारिकांची संख्या सर्वाधिक आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले. इस्रायलने हमासपाठोपाठ सीरियावरही हल्ला केल्याने युद्धाचा भडका आणखी वाढण्याची भीती आहे. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळांच्या रनवेचे नुकसान झाले आहे. हा हल्ला नेमका का केला याबाबत इस्रायलने माहिती दिलेली नाही.
१८,००० भारतीय इस्रायलमध्ये राहतात. यात परिचारिका, विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारी यांचा समावेश आहे.
घमासान युद्ध सुरू असलेल्या इस्रायलमधून अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान भारताकडे रवाना होण्यापूर्वी विमानतळावर झालेली गर्दी. ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत भारत सरकार ही मोहीम राबवत आहे.
विमानतळावर रांगाविमानात चढण्यासाठी भारतीयांची लांबच लांब रांग विमानतळावर होती. भारतीय दूतावासाकडून योग्य सूचना देण्यात आल्या, त्यामुळे आमचे मनोबल वाढले, असे इस्रायलमधील विद्यार्थी शुभम कुमार याने सांगितले.
जमिनीवरून हल्ल्यासाठी हवा फक्त एक आदेशहमास या दहशतवादी संघटनेचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझावर जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी पूर्ण झाली असून, आता केवळ प्रमुख नेत्यांनी आदेश देण्याचा बाकी असल्याचे इस्रायलचे लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, इस्रायलने सुमारे ३,६०,००० राखीव सैन्य २३ लाख लोक राहत असलेल्या गाझा सीमेवर तैनात केले आहे. हमासने केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदला म्हणून लवकरच कारवाई करण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे.
१२०० - गाझामध्ये मृत्यू१३०० - इस्रायलमध्ये मृत्यू१५०० - हमासचे दहशतवादी ठार