रायपूर - छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यामध्ये तसेच मध्य प्रदेशमधील बालाघाट येथे सुरक्षा दलांशी झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींमध्ये १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांविरोधात अधिक व्यापक मोहीम उघडण्यात आली. छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता सुरक्षा दलाशी चकमक होऊन नक्षलवाद्यांना मोठा दणका देण्यात आला.
छत्तीसगडमध्ये बस्तर लोकसभा मतदारसंघात विजापूरचा भाग येतो. या मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. गंगळूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लेंद्रा गावानजीकच्या जंगलामध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता नक्षलवादी व सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली असताना ही घटना घडल्याचे बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.
छत्तीसगडमध्ये डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्क फोर्स, केंद्रीय राखील पोलीस दल, कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ॲक्शन (कोब्रा) या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना पकडण्यास संयुक्त मोहिम हाती घेतली. मार्च ते जून या कालावधीत नक्षलींकडून जास्त हल्ले हाेतात.
मशिन गन, ग्रेनेड लाॅंचरही हाेते नक्षलवाद्यांकडे - चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. - त्यांच्याकडून मशीनगन, बॅरेल ग्रेनेड लाँचर अशी शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा सुरक्षा दलाने जप्त केला आहे. - घनदाट जंगलात शोध घेतला असता आणखी ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.
महाराष्ट्र पोलिसांना हवे असलेले दोघे ठारमध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून एके-४७ रायफल, १२ बोअरची रायफल व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. केराझारी भागामध्ये सोमवारी रात्री ९ ते १०च्या दरम्यान ही चकमक झाली. त्यात सजांती उर्फ क्रांती ही महिला व रघू उर्फ शेरसिंग या दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अनेक गुन्ह्यांप्रकरणी हे दोन नक्षलवादी पोलिसांना हवे होते. त्यांना पकडून देण्यास सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसांची एकूण रक्कम ४३ लाख रुपये आहे.
नक्षलवाद्यांकडे आहेत आधुनिक शस्त्रास्त्रे छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील चकमकींत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडे विदेशी शस्त्रे आढळून आली आहेत. याआधीही नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाने एके रायफली जप्त केल्या आहेत. या नक्षलवाद्यांकडे चिनी बनावटीची शस्त्रेही आढळून आली आहेत.