- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कर बुडवून साठविलेल्या रोख रकमेतून केले जाणारे व्यवहार शोधणे आता तंत्रज्ञानाच्या आधारे हुडकून सहज शक्य झाल्याने, काळा पैसेवाल्यांची आता खैर नाही, असा इशारा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिला आणि लोकांनी स्वत:हून प्रामाणिकपणे कर भरून निश्चिंत व्हावे, असे आवाहन केले.नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने हाती घेतलेल्या ‘आॅपरेशन क्लीन मनी’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरीस जेटलींनी त्याच नावाच्या पोर्टलचा शुभारंभ केला. त्या वेळी बोलताना जेटली यांनी सांगितले की, नोटाबंदीनंतर प्राप्तिकराच्या ई-रिटर्नमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या नव्या पोर्टलने प्रामाणिक करदात्यांना मदत होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशिल चंद्रा यांनी सांगितले की, कर बुडविल्याची एक लाखांहून अधिक संशयित प्रकरणे हुडकून काढली आहेत व त्यातून १६, ३९८ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न उघड झाले आहे. नोटाबंदीनंतर ९६ लाख नवे करदाते कर भरण्यासाठी पुढे आले आहेत, असेही ते म्हणाले.
नवे पोर्टल कशासाठी?- या पोर्टलवर लोकांना सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी मिळेल व शंकांचेही समाधान होईल.- प्रामाणिक करदाते आपले अनुभव इतरांना कळवून त्यांनाही प्रोत्साहित करू शकतील.- प्राप्तिकर विभागासही पारदर्शी पद्धतीने काम करण्यास मदत होईल.नोटाबंदीच्या काळात ज्यांनी मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचा भरणा केला, अशा व्यक्तींच्या व्यवहारांचे ई-व्हेरिफिकेशन करण्याचे काम या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात केले गेले. त्यात ज्यांचा करभरणा रोख भरण्याची मेळ खात नाही, अशा १८ लाख व्यक्ती आढळल्या. यापैकी ९.२ लाख करदात्यांनी ई-व्हेरिफिकेशन करून १३.३३ लाख खात्यांमध्ये केल्या गेलेल्या २.८९ लाख कोटी रुपयांच्या रोख भरण्याचा खुलासा केला. याची छाननी केली गेली व ज्यांचा खुलासा समाधानकारक वाटला त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.