ऑनलाइन लोकमत
गुरूदासपूर, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करणा-या तिघा दहशतवाद्यांना तब्बल १० तासांच्या मोहीमेनंतर कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिस शहीद झाले असून तिघा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाकिस्तानमधून पठाणकोट या भारतीय सीमेवरील गावातून तिघे दहशतवादी सैन्याच्या गणवेषात भारतात घुसले. तिथून त्यांनी जबरदस्तीने एक मारूती कार ताब्यात घेतली आणि राज्य सरकारच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर या दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. यापूर्वी दहशतवाद्यांनी दीनानगर- पठाणकोट रेल्वे मार्गावर पेरलेले ५ जिवंत बाँब हस्तगत करण्यात आले असून ते निकामी करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस ठाण्यालगच्या एका इमारतीमध्ये हे तिघे दहशतवादी लपून बसले होते. यानंतर पंजाब पोलिसांच्या जवानांनी या इमारतीला चोहोबाजूंनी वेढा घातला. एनएसजी व स्वॅटचे (विशेष शस्त्र व धोरण पथक) जवानही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल १० तासाहून अधिक वेळ सुरक्षा दलाचे जवान व दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. संध्याकाळी साडे चारच्या सुमारास तिस-या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले व जवानांनी 'जो बोले सो निहाल' अशी घोषणा देत ऑपरेशन गुरदासपूर संपल्याचा इशाराच दिला. या हल्ल्यात गुरूदासपूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक बलजीत सिंह शहीद झाले आहेत.
दरम्यान, या हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने महाराष्ट्रातील काही शहरांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी मोठ्या शहरांना हाय अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये गेल्या आठ वर्षातील हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.