नवी दिल्ली : सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार भारतीय लष्कराच्या मदतीने बचाव मोहीम राबवत आहे. सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे. या ऑपरेशनअंतर्गत आतापर्यंत किती भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यात आले आहे, यासंदर्भात परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, "15 एप्रिलपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर आम्ही सुदानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. सुदानमध्ये जवळपास 3500 भारतीय आणि 1000 पीआयओ असल्याचा आमचा अंदाज आहे." याशिवाय, सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी तिसरे नौदलाचे जहाज आयएनएस तरकश देखील आज सुदान बंदरावर पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला आणि अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जवळपास 600 लोक भारतात पोहोचले आहेत. 246 लोकांना महाराष्ट्र राज्यात पाठवले जात आहे", असे विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. तसेच, भारताला अनेक विनंत्या मिळाल्या आहेत, ज्यामध्ये इतर देशांच्या नागरिकांनाही स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे, अशीही परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली.
आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आफ्रिकन देश सुदानमधून आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी 360 भारतीयांना सौदी अरेबियातून चार्टर फ्लाइटद्वारे भारतात सुखरूप आणण्यात आले. 246 प्रवाशांना सी-17 विमानातून महाराष्ट्रात पाठवले जात आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, 495 भारतीय अजूनही जेद्दाहमध्ये आहेत, त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे.
सर्वाधिक प्रभावित क्षेत्र खार्तूमसुदानमधील सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असलेल्या खार्तूममधून भारतीयांना सुदानच्या सुरक्षित बंदरात आणण्यासाठी बसेसचा वापर केला जात आहे. मात्र, तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अशा परिस्थितीत सर्वांना सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान आहे. सर्वांना खार्तूमहून सुदान बंदरात आणले जात आहेत, जिथे भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस तरकश आधीच उपस्थित आहे.