श्रीनगर - जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील करन नगर येथील सीआरपीएफ कॅम्पजवळ लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेली चकमक 32 तासांनंतर संपली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीआरपीएफ कॅम्पजवळील इमारतीत चार दहशतवादी लपले होते. सुरक्षा जवानांनी मात्र त्यांचा प्रयत्न हाणून पाडत इमारतीत एक मोठा स्फोट केला. दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं आहे. दरम्यान सुंजवां आर्मी कॅम्पमध्ये अजून एका जवानाचा मृतदेह सापडला आहे. यासोबतच सुंजवांमध्ये शहीद झालेल्या जवानांचा आकडा सहावर पोहोचला आहे.
सीआरपीएफचे आयजी ऑपरेशन जुल्फिकार हसन यांनी चकमक अद्यापही सुरुच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. चकमकीदरम्यान नागरिक आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दोन्ही बाजूने थांबून थांबून फायरिंग सुरु होती. सीआरपीएफ जवानांनी दहशतवादी लपले असलेल्या इमारतीला वेढा घातला होता.
सुंजवां येथे लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर सोमवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील करण नगर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. श्रीनगरच्या करन भागात सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलीस दल) शिबिरावर सोमवारी सकाळी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी कोसळत्या बर्फात उधळून लावला. यानंतर अतिरेकी लपून बसले असता निमलष्करी दलाच्या जवानाने त्यांना पाहिले. तेव्हा उडालेल्या चकमकीत निमलष्करी दलाचा एक जवान शहीद झाला आहे. अतिरेक्यांना शोधण्यासाठी आॅपरेशन सुरू आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेचा काश्मीरचा प्रमुख मेहमूद शाह याने हा दावा केला आहे.
सोमवारी सीआरपीएफचे आयजी रवीदीप सहाय यांनी सांगितलं होतं की, 'पहाटे 2 वाजता दहशतवाद्यांनी सीआरपीएफ मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांचा इमारतीत घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला, मात्र जवळच्या एका इमारतीत ते घुसले. पाच कुटुंबाना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. ऑपरेशन अद्यापही सुरु आहे'. यावेळी सीआरपीएफच्या 49 व्या बटालियनमधील एक जवान गंभीर जखमी झाला होता. उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.
पाकिस्तानशी चर्चा कराहिंसाचार थांबविण्यासाठी पाकशी चर्चा करा अशी मागणी जम्मू -काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. विधानसभेत त्या म्हणाल्या की, जर फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी केली तर त्यांना राष्ट्रविरोधी म्हटले जाते. मात्र, या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. या मुद्यावर आम्ही म्हणजे काश्मिरींनी चर्चा नाही करायची तर, कोण चर्चा करणार?