ओपिनियन पोल : गुजरातमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट, काँग्रेसचा टक्का वाढला, मात्र सत्ता भाजपाकडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 08:57 PM2017-11-09T20:57:04+5:302017-11-09T21:33:42+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब आज प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब आज प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे. या आोपिनियन पोलनुसार भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट होत असल्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितही गुजरातमधील सत्ता टिकवण्यात भाजपा यशस्वी ठरणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा सर्व्हे 26 ऑक्टोबर 1 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता. या ओपिनियन पोलमध्ये 200 पोलिंग बुथमधील 3 हजार 757 जणांचे मत जाणून घेण्यात आले. या ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 41 टक्के तर भाजपाला 47 टक्के मते मिळतील. तर मतांचे जागांमध्ये होणारे रूपांतर पाहिल्यास काँग्रेसला 58 ते 64 जागा आणि भाजपाला 113 ते 121 जागा मिळतील. तर इतरांना 1 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 48 टक्के मते आणि 116 जागा मिळाल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आगामी मतदानात मतांच्या टक्केवारीत वर्तवण्यात आलेली लक्षणीय घट भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.
एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीने याआधी आॉगस्टमध्ये घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजपाला 144 ते 152 तर काँग्रेसला 26 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
ओपिनियन पोलमधील महत्त्वाचे मुद्दे
दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला आघाडी
35 विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला 51 टक्के मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 33 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. आदिवासीबहुल असलेल्या दक्षिण गुजरातमध्येही भाजपासाठी अनुकूल वातावरण आहे. पारंपरिक व्होटबँक असलेल्या आदिवासींवरील काँग्रेसची पकड ढिली झाल्याचे संकेत ओपिनियन पोलमधून मिळत आहेत.
सौराष्ट्रमध्ये कांटे की टक्कर
पटेलांचा बोलबाला असलेल्या सौराष्ट्रमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. विधानसभेच्या 54 जागा असलेल्या सौराष्ट्रमध्ये भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी 42 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सौराष्ट्रमध्ये पाटीदारांच्या नाराजीचा फटका भाजपाला बसताना दिसत आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाविरोधात उघड भूमिका घेतल्याने सौराष्ट्रमध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे.
उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसची मुसंडी
उत्तर गुजरातमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याचा अंदाज आहे. एकूण 53 जागा असलेल्या उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसला 49 टक्के तर भाजपाला 44 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असलेल्या उत्तर गुजरातमध्ये शेतकरी वर्ग भाजपाविरोधात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील मतदार परिवर्तन घडवण्यास उत्सुक आहे.
मध्य गुजरातमध्ये भाजपाचा बोलबाला
40 जागा असलेल्या मध्य गुजरातमध्ये भाजपाला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. येथे भाजपाला 54 टक्के तर काँग्रेसला 38 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मध्य गुजरातमधील शहरी मतदार मात्र भक्कमपणे भाजपाच्या मागे उभे आहेत.
गुजरातमध्ये महिला भाजपाच्या बाजूने
या ओपिनियन पोलमधून महिलांचा कल भाजपाकडे दिसून येत आहे. सुमारे 50 टक्के महिला भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचा अंदाज आहे. तर 39 टक्के महिलांनी काँग्रेसला पसंती दिली आहे.