नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी नोंदवलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे. तर मागील निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी व्होटरनं ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा आपची सत्ता येईल, असा अंदाज यामधून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी तब्बल ७० टक्के दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांनाच पसंती दिली आहे. १ ते ६ जानेवारी दरम्यान केलेल्या सर्वेक्षणातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.एबीपी न्यूज-सी व्होटरनं १३ हजार ७६ लोकांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेतला. यातील बहुसंख्य जणांनी आप गेल्या निवडणुकीप्रमाणेच शानदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात ८ जागांची घट होईल असा अंदाज आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीला ५९ जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदाही दुहेरी आकडा गाठता येणार नाही. देशात सत्ता असलेल्या भाजपाला दिल्लीत केवळ ८ जागा मिळू शकतील. याचा अर्थ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची कामगिरी किंचित सुधारेल. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकणारी काँग्रेस यंदा ३ जागा जिंकू शकेल. एकूण ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत बहुमत गाठण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. हा आकडा यंदाही आम आदमी पार्टी अगदी सहज गाठेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांनाच पसंती दिली आहे. केजरीवालच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७० टक्के लोकांनी व्यक्त केला. तर ११ टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांना पसंती दिली. काँग्रेसच्या अजय माकन यांना ७ टक्के, तर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना केवळ १ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. आम आदमी पार्टीला विधानसभा निवडणुकीत ५३.३ टक्के मतं मिळू शकतात. तर लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या सर्वच्या सर्व सातही जागा दोन लाखांहून अधिक मताधिक्क्यानं जिंकणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत २५.९ टक्के मतं मिळू शकतात. काँग्रेसला या निवडणुकीत केवळ ४.७ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.
फिर एक बार मुख्यमंत्रिपदी केजरीवाल; तब्बल ७० टक्के दिल्लीकरांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 8:42 AM