नवी दिल्ली: यंदाच्या वर्षाच्याअखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिन्ही राज्यातील जनता काँग्रेसला 'हात' देण्याचा अंदाज एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं हे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांना धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. मध्य प्रदेशात भाजपाला 40 टक्के, तर काँग्रेसला 42 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण 230 आमदार निवडून जातात. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार एकूण 230 पैकी 117 जागांवर काँग्रेसला यश मिळेल. तर भाजपाला 106 जागांवर समाधान मानावं लागेल. विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधी चित्र असलं, तरी लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश मोदींना साथ देईल, असं सर्वेक्षणातील आकडे सांगतात.छत्तीसगडमध्येदेखील भाजपाला धक्का बसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रमण सिंह नेतृत्त्व करत असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपाला 39 टक्के, काँग्रेसला 40 टक्के आणि इतर पक्षांना 21 टक्के मतदान होईल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. मतदानाच्या टक्केवारीत भाजपा-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर असली, तरी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असं आकडेवारीवरुन दिसतं आहे. 90 जागा असलेल्या छत्तीसगडच्या विधानसभेत काँग्रेसला 54, तर भाजपाला 33 जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र मध्य प्रदेशप्रमाणेच छत्तीसगडदेखील लोकसभेत मोदींना साथ देईल, अशी शक्यता आहे. राजस्थानमध्येही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसारखंच चित्र दिसेल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त होत आहे. राजस्थानातील जनता विधानसभा निवडणुकीत हाताला साथ देईल, असा अंदाज आहे. राजस्थानात विधानसभेचे 200 मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 57 टक्के मतांसह 130 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर भाजपाला 37 टक्के मतं मिळतील. त्यांना अवघ्या 57 जागांवर समाधान मानावं लागेल, अशी शक्यता आहे. विधानसभेत हाताला साथ देणारं राजस्थान लोकसभेत मात्र मोदींच्या पाठिशी उभं राहील, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
Opinion Poll: राजस्थान, म. प्रदेश, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार? मतदार काँग्रेसला 'हात' देण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:09 PM