भाजपने मोदी@9 अभियानाच्या माध्यमातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर, नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट झाली असून २६ पक्षांनी एकत्र येत आघाडीही स्थापन केली आहे. त्यामुळे, २०२४ च्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए विरुद्ध विरोधकांच्या एकजुटीतून स्थापन झालेल्या इंडियाचा सामना रंगणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार करत, थेट दहशतवादी संघटनांशी तुलना केली आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत निश्चित मानली जात आहे.
लोकसभा २०२४ च्या निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे, सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण करण्यात आलं असून २०२४ च्या निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया असा सामना झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज घेण्यात आला आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने (India TV-CNX Opinion Poll) हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३१८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळू शकते. इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी एनडीएला ३१८, इंडियाला १७५ आणि इतरांना ५० जागा मिळू शकतात. दरम्यान, 'इतर' मध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे.
इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार २०२४ ला देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेत येईल. पण, गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी होणार आहेत. भाजपच्या जागा ३०३ वरुन २९० पर्यंत खाली येऊ शकतात. तर, काँग्रेसच्या जागा काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीत ५२ जाग जिंकलेल्या काँग्रेसला ६६ जागांवर विजय मिळू शकतो. त्यामुळे, विरोधकांच्या आघाडीत काँग्रेस सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष ठरू शकतो.
महाराष्ट्रात शिंदे गटाला फटका
दरम्यान, या सर्वेक्षणानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतील याचाही अंदाज लावण्यात आला आहे. सध्या उबाठा गटाकडे ६ जागा आहेत, त्या ११ पर्यंत वाढू शकतील. तर, महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजप २०, काँग्रेस ९, शिवसेना (शिंदे) २, शिवसेना (ठाकरे गट) ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ४ जागा मिळण्याची अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या (शिंदे गट) जागा १२ वरुन थेट २ पर्यंत खाली येऊ शकतात.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. आपची एका जागेवरुन १० जागांपर्यंत लक्षणीय वाढ होऊ शकते.