लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. सोशल मीडिया, एसएमएस, फोन आदींवरून राजकीय पक्षांनी प्रचार केला. याचबरोबर निवडणूक आयोगानेही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एवढे करूनही २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाल्याने निवडणूक आयोग चिंतेत आला आहे. राजकीय पक्षांची धाकधूक वाढलेली असताना आयोगाने उरलेल्या टप्प्यांत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवीन तयारी सुरु केली आहे.
या लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी लोकांमध्ये उत्साह होता, परंतु ते मतदान केंद्रावर येऊन मतदान करतील एवढा नव्हता, असे आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. मतदान वाढविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. स्वीप कार्यक्रमानुसार मतदान वाढविण्याची मोहिम आखण्यात आली आहे. प्रसिद्ध व्यक्तींना निवडणूक आयोगाचा दूत बनवून लोकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांनाही चांगले बनविण्यात आले आहे. परंतु असे वाटतेय की हे प्रयत्न पुरेसे नसतात, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
कमी मतदाना का झाले, याची चौकशी निवडणूक आयोग करत आहे. यामागे काही कारणेही आयोगाच्या लक्षात आली आहेत. या आठवड्याच्या अखेरीस असलेल्या बैठकांमध्ये यावर चर्चा केली जाणार आहे. मतदान कमी होण्यामागे उष्णता हे देखील एक कारण असू शकते, असे सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. यावेळी २०१९ च्या तुलनेत ८ दिवस उशिराने निवडणूक सुरु झाली आहे. तसेच मतदानाच्या पूर्वीच काही संस्था, चॅनेल्स कल कोणाकडे आहे हे दाखवितात यामुळे देखील मतदारांमध्ये मतदानाविषयी उदासिनता दिसत आहे. तसेच लग्नसमारंभ, हवामान आदी देखील कारणीभूत असल्याचे आयोगाला वाटत आहे.