मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधकांनी लोकसभा निवडणुकी आधीच पराभवाचा बहाना शोधला आहे. विरोधक आतापासूनच ईव्हीएमवर सवाल करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजपाच्या बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. कोलकात्याच्या परेड ग्राऊंडवर शनिवारी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र घेऊन महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष केले. विरोधकांनी महाआघाडी केली आहे आणि आम्ही सुद्धा केली. त्यांनी इतर पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी केली आहे. मात्र, आम्ही देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत केली आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा कोणती आघाडी सर्वांत चांगली आहे, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
ममता बॅनर्जी यांच्या महामेळाव्यात जास्तकरुन मोठ्या नेत्यांची मुले उपस्थित होती. काही जण असे सुद्धा होते की आपल्या मुलाला किंवा मुलीला राजकारणात घुसवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याजवळ धनशक्ती आहे. मात्र, आमच्याजवळ जनशक्ती आहे. विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक अनोखे बंधन आहे. हे बंधन नामदारांचे बंधन आहे. हे बंधन भाऊ-पुतण्या वाद, भ्रष्टाचार, घोटाळा, नकारात्मकता आणि असमानता यांचे गठबंधन आहे. हे एक अद्भुत संगम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला.
विरोधी पक्षातील लोकांना कोणत्याही संस्थेवर भरोसा नाही आहे. त्यांनी ते संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. विरोधकांच्या कालच्या महामेळ्यात लोकशाही वाचविण्याचे काहीजण सांगत होते. मात्र, त्यांच्यातील एका नेत्यांने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करुन दिली. शेवटी सत्य बाहेर येणारच, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाना साधला.