लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अदानी प्रकरणाच्या संसदीय समिती चौकशीची (जेपीसी) मागणी करत संसद भवनापासून ईडी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढणाऱ्या काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी बॅरिकेड्स उभारून विजय चौकाजवळ रोखले. पुढे जाणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांनी मोर्चा स्थगित केला.
पोलिसांनी ध्वनिक्षेपकाचा वापर करून आंदोलक खासदारांना क्षेत्र रिकामे करण्याचे आवाहन केले. जेव्हा नेते बॅरिकेड ओलांडू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी आपला मोर्चा मागे घेतला. विरोधी पक्षांच्या या मोर्चात तृणमूलचा भाग नव्हता. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्याच्या निषेधार्थ त्यांच्या खासदारांनी संसद भवन संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.
सरकार लोकशाही कमकुवत करतेय : काँग्रेस
मोदी सरकारवर एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संसदेचे कामकाज ठप्प करून देशातील लोकशाही पोकळ आणि कमकुवत केल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकार संसदेत जे काही करत आहे, ते देशातील लोकशाहीचा ऱ्हास होत असल्याचा पुरावा आहे.
संसदेत ‘ॲक्शन रिप्ले’
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही आदल्या दिवशीच्या कामकाजाचा ‘ॲक्शन रिप्ले’ दाखवल्यासारखे कामकाज झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लंडनमधील वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी रान उठवले, तर विरोधकांनी अदानी प्रकरणात संसदीय समिती चौकशीची (जेपीसी) मागणी लावून धरली. गदारोळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.
‘इलारा’-अदानी’बद्दल प्रश्नचिन्ह
- अदानी समूहाचा मोठा गुंतवणूकदार याच कंपनीच्या संरक्षणविषयक कंपनीत भागीदार असल्याचा दावा करणाऱ्या एका वृत्ताबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला.
- ‘इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड’ ही कंपनी मॉरिशसमध्ये नोंदणीकृत चारपैकी एक कंपनी आहे, जी अदानी ग्रुप ऑफ कंपनीजची प्रमुख भागधारक आहे. बंगळुरूस्थित संरक्षण कंपनी ‘अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजी’मध्ये अदानी समूहासोबत एलारा आयओएफ मालकांपैकी एक आहे.
- इस्रो आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या कंपनीशी जवळून काम करते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड का केली जात आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
भारतातील लोकशाहीवर हल्ले चढविण्यात येत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली होती.सरकारवर देशात किंवा परदेशात टीका करण्याचा नागरिकाला हक्क आहे. त्यासाठी त्याला देशविरोधी ठरविता येणार नाही,नागरिकाने आपल्या सरकारवर देशात किंवा परदेशात टीका करणे ही काही नवीन घटना नाही. मोदी यांनीही विदेश दौऱ्यांमध्ये आपल्या विरोधकांवर टीका होती. - कपिल सिब्बल, राज्यसभेचे खासदार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"