नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपली उत्पादने विकूच नये, अशी काही लोकांची इच्छा असून हे लोक शेतकºयांसाठी पूजनीय असलेल्या वस्तू व उपकरणे जाळून शेतकºयांचा अपमान करीत आहेत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.नव्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनादरम्यान ट्रॅक्टर जाळल्याच्या घटनेच्या अनुषंगाने मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. हे लोक ना शेतकºयांसोबत आहेत, ना तरुणांसोबत, ना सैनिकांसोबत, असेही मोदी म्हणाले.
राजधानी दिल्लीत राजपथावर आंदोलनात सोमवारी एक ट्रॅक्टर जाळण्यात आला होता. या आंदोलनात पंजाब युवक काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते. यासंदर्भात मोदी यांनी आंदोलकांवर टीकेची झोड उठविली. उत्तराखंडमधील ‘नमामि गंगे मिशन’शी संबंधित सहा प्रकल्पांचे उद्घाटन मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आता शेतकरी आपली उत्पादने कोणालाही व कोठेही विकू शकतो. सरकार शेतकºयांना हक्क मिळवून देण्यास प्रयत्न करीत असताना हे लोक त्याला विरोध करीत आहेत. शेतकºयांनी आपली उत्पादने खुल्या बाजारात विकूच नये, मध्यस्थांचीच भरभराट होत राहावी, असे या लोकांना वाटते. शेतकरी ज्यांची पूजा करतात, अशा वस्तू व उपकरणे जाळून हे लोक शेतकºयांचा अपमान करीत आहेत.केवळ विरोधासाठी विरोधयाच लोकांनी गरिबांच्या जन-धन खात्यांना आणि डिजिटल पेमेंटच्या प्रोत्साहनास विरोध केला होता. जीएसटी, वन रँक-वन पेन्शन, सर्जिकल स्ट्राईक, गरिबांचे १० टक्के आरक्षण, आंतरराष्ट्रीय योग दिन, राफेल विमानांची खरेदी, स्टॅच्यू आॅफ युनिटी आणि श्रीराम मंदिराची पायाभरणी, अशा अनेक सरकारी पुढाकारांना याच लोकांनी विरोध केला होता.