भारुच (गुजरात) - बुलेट ट्रेन प्रोजेक्टला विरोध करणा-यांनी बैलगाडीने प्रवास करावा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. काँग्रेसने अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टला आपला विरोध दर्शवला असून, त्याच पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदींनी हा अत्यंत कमी किंमतीत प्रोजेक्ट पुर्ण होत असल्याचं सांगत काँग्रेसला उत्तर दिलं. काँग्रेस सरकारलाही हा प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती, पण अयशस्वी ठरले. म्हणून आता विरोध करत आहेत असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.
'जे बुलेट ट्रेन प्रोजेक्टला विरोध करत आहेत, त्यांनी बैलगाडीने प्रवास करावा. आमची काही हरकत नाही', असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तिरावर अमोद साखर कारखान्याजवळ पार पडलेल्या रॅलीत बोलताना नरेंद्र मोदींनी ही टीका केली.
'या प्रोजेक्टमुळे गुजरातमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. किती रोजगार उभे राहतील याचा विचार करा. बुलेट ट्रेनसाठी सिमेंट कुठून खरेदी होणार ? लोखंड कुठून येणार ? कामगार कुठले असणार ? हे सगळं भारतातूनच मिळणार ना ? आणि हे सर्व कोण विकत घेणार ? जपान. ही मोठी संधी नाही का ? ', असे सवाल विचारत नरेंद्र मोदींनी प्रोजेक्टचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
'मनमोहन सिंग यांचं सरकार असताना युपीएला हा प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती, पण ते करु शकले नाहीत. एनडीए सरकारने अत्यंत कमी किंमतीत हा प्रोजेक्ट आणला होता. काँग्रेसला हे आवडलेलं नाही. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की, जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवू शकला नाहीत, तर ती दुस-या मिळवली म्हणून तुम्हाला एवढा त्रास का होतो', असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
यावेळी मोदींनी नेहरु - गांधी कुटुंबावरही टीका केली. 'त्यांनी गुजरातसाठी काय केलं ? त्यांनी प्रोजेक्ट सुरु करण्याचा विचार तरी केला का ? इतकी वर्ष त्यांनी फक्त गावं, शहरं, समाज आणि लोकांना विभागण्याचं काम केलं. पण जेव्हापासून भाजपा सत्तेत आली आहे, तेव्हापासून हे सर्व बंद झालं आहे. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा असा एकही दिवस नव्हता जेव्हा त्यांनी गुजरातला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला', अशी टीका मोदींनी केली.