मुंबई : मूडीजने नुकतंच भारतीय अर्थव्यवस्थेचं तोंडभर कौतुक केलं. यावेळी मोदी सरकारनं सुधारणांचं श्रेय घेतलं. काही विरोधकांना मोदी सरकारने घेतलेलं श्रेय आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी टीका करण्यासाठी मूडीज एजन्सीच्या फेसबुक पेजचा शोध घ्यायला सुरुवात केली. मूडीजवर टीका करण्याच्या नादात हे ट्रोलर्स तोंडघशी पडले आहेत. मूडीजऐवजी अनेकांनी चक्क माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यावर तोंडसुख घेतलं.टीकाकारांमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. बऱ्याचशा कमेंट्स या मल्ल्याळम आणि इंग्रजी भाषेत होत्या. अखेर काही वेळानं कार्यकर्त्यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी टॉम मूडी यांची माफीही मागितली. मूडीजचं पेज शोधता शोधता विरोधकांना माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील टीम सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांचं पेज सापडलं. त्यामुळे ट्रोलर्सनी चुकून त्यांच्यावरच टीकेचा भडीमार केला. भारतीय अर्थव्यवस्थेला असं रेटिंग दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं थेट टॉम मूडी यांनाच सुनावलं.
आर्थिक आणि संस्थात्मक सुधारणांमुळे वृद्धीची शक्यता वाढल्याने रेटिंगमध्ये सुधारणा झाल्याचं मूडीजने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मूडीजने भारताचं रेटिंग 13 वर्षांनी अपग्रेड केलं आहे. याआधी 2004 मध्ये भारताचं रेटिंग वाढवून ‘Baa3’ केलं होतं. तर 2015 मध्ये रेंटिंग स्थिरवरुन (स्टेबल) सकारात्मक (पॉझिटिव्ह) श्रेणीत ठेवलं होतं.
मूडीजने काय म्हटलं?एखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं आहे.