नागपूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित व गेल्या काही काळापासून मौन धारण केलेले खा. वरुण गांधी यांनी संघभूमीत येऊन स्वपक्षीयांनाच चिमटे काढले. एक बटन दाबल्याने लोकप्रतिनिधी निवडून येतात. कुठलाही लोकप्रतिनिधी १०० टक्के मते घेऊन निवडून येत नाही. त्यामुळे जिंकल्यावर पाच वर्षांसाठी त्याचे गुलाम म्हणून राहणे ही व्यवस्था देशासाठी योग्य नाही. अनेकदा विरोधी बाकांवर तज्ज्ञ सदस्य असतात. त्यांचा सन्मान व्हायला हवा. या तज्ज्ञांनादेखील मंत्रिपद देता येईल का यावरदेखील विचार व्हायला हवा, अशी सरबत्ती त्यांनी केली.शनिवारी आयोजित युवा सन्मान संवाद युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला डॉ.आंबेडकरी विचारांचे चिंतक अशोक भारती, राजकुमार तिरपुडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. केशव वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. संसदेमध्ये २००हून अधिक खासदारांकडे २० कोटींहून अधिक संपत्ती आहे. अशा खासदारांनी आपले मानधन समाजकार्यासाठी द्यावे, असा प्रस्ताव मी लोकसभा अध्यक्षांना दिला होता. खासदारांना वेतनवाढीची आवश्यकता नाही. परंतु खासदार संसदेत वेतनवाढीसाठी गोंधळ घालतात तो दिवस काळा दिवसच म्हणायला हवा. नऊ वर्षांच्या कार्यकाळात मी एकही रुपयाचे मानधन घेतलेले नाही. राजकारणाचा वापर जनसेवेसाठीच व्हायला हवा. महिला आरक्षणासंदर्भातदेखील आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे वरुण गांधी म्हणाले. या वेळी महेश पवार, मारोती चवरे, संजीवनी ठाकरे पवार, प्रशांत डेकाटे, श्रीकांत भोवते, गौरव टावरी यांचा युवा कृतज्ञता सन्मान देऊन गौरव करण्यात आला. नितीन चौधरी यांनी आभार मानले.मोदी सरकारच्या कामगिरीवर मौनवरुण गांधींना या वेळी प्रसारमाध्यमांकडून मोदी सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीवर समाधानी आहात का, असे विचारण्यात आले. एकेकाळी प्रसारमाध्यमांशी सहजपणे बोलणाऱ्या गांधी यांनी मौन पाळणेच पसंत केले. मी सध्या बोलणे सोडले आहे, हे त्यांचे वक्तव्य सूचक होते.
विरोधकांचादेखील सन्मान व्हावा; वरुण गांधींनी स्वपक्षीयांना दिला घरचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:30 IST