नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकार सामान्य व्यक्तीचा सरकारमधील सहभाग वाढावा आणि त्याने सरकार चालवण्यास मदत करावी यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारने केंद्रासाठी काम करून 20 हजार रूपयांपर्यंत कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
नोटबंदीपासून मोदी सरकार कॅशलेस व्यवहारांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी दोन टास्कचं आयोजन करण्यात आलं आहे. या टास्कमध्ये भाग घेऊन आणि विजयी होऊन तुम्हाला केवळ बक्षिसच मिळणार नाही तर तुमच्या कलेचा उपयोग देशभरासाठी होणार आहे. सरकारने 'डिजीटल पेमेंट अवेअरनेस' प्रोग्रामचं आयोजन केलं आहे. या प्रोग्रामसाठी केंद्र सरकारला सिग्नेचर टोन, लोगो आणि टॅगलाइन तयार करायची आहे. या कामासाठी मोदी सरकारने तज्ञांची मदत घेण्याऐवजी सामान्य व्यक्तीची मदत घेण्याचं ठरवलं आहे.
जर तुम्हाला संगिताची आवड असेल तर तुम्ही सिग्नेचर टोन बनवण्यामध्ये सरकारची मदत करू शकतात. जर तुमचं लिखाण चांगलं असेल किंवा तुम्ही चांगला लोगो डिझाइन करत असाल तर तुम्ही सरकारसाठी हे काम करू शकतात. दोन्ही आयोजनांमध्ये सरकार तीन जणांना बक्षिस देणार आहे.
सर्वात चांगली सिग्नेचर टोन बनवणा-याला 10 हजार रूपयांचं बक्षिस दिलं जाईल. त्या खालोखाल इतर दोन टोन बनवणा-यांना अनुक्रमे 5 हजार आणि 3 हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. लोगो आणि लाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वात चांगल्या टॅगलाइनला 20 हजार रूपयांचं बक्षिस दिलं जाईल. दुस-या क्रमांकावरील व्यक्तीला 15 हजार आणि तिस-या क्रमांकाला 7 हजार 500 रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे.
कसा घ्यायचा सहभाग -5 डिसेंबरपर्यंत यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. सहभाग कसा घ्यायचा, कोणते नियम आणि अटी आहेत याबाबत सर्व माहिती Mygov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.