मुंबई : भाजपने जाहीर केलेल्या १३५ उमेदवारांच्या यादीत कृपाशंकर सिंह यांना स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर झाली नसली तरी महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री असलेल्या कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील त्यांच्या जौनपूर जिल्ह्यातून लोकसभा लढविण्याची संधी भाजपच्या कृपेने मिळाली आहे.
आपली सर्व कारकीर्द मुंबईत घडविणाऱ्या कृपाशंकर यांना जौनपूरमधून उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या जागेवर माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांची भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची जोरदार अशी चर्चा होती. निवडणूक लढविण्यासाठी ऑक्टोबर २०२३मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. पहिल्या १३५ जणांच्या यादीत मात्र त्यांना स्थान मिळविता आलेले नाही. मात्र भाजपने मुंबईकर कृपाशंकर यांना जौनपूरमधून उमेदवारी देत धक्कातंत्र वापरल्याचे बोलले जात आहे.
१९७१मध्ये रोजगाराच्या शोधात मुंबईत आलेल्या कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत कांदे-बटाटे विकण्यातून आपला उदरनिर्वाह सुरू केला होता. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००४ मध्ये काँग्रेस सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री झाले. त्यांची राजकीय वाटचाल सुरू असतानाच २०१४मध्ये ३०० कोटींची अवैध मालमत्तेप्रकरणी ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले. २०१९मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाच्या विचारात असलेल्या कृपाशंकर यांनी २०२१मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये त्यांना उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारी नियुक्त करण्यात आले. ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आता तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
याच दिशेने वाटचाल- याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले सत्यपाल सिंह यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली होती. ते विजयी होऊन केंद्रात राज्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे माजी आमदार रमेश दुबे हे महाराष्ट्राचे राज्यमंत्री होते. - पुढे जाऊन त्यांनी बहुजन समाज पार्टीतून उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवून ते खासदार झाले होते. त्याच दिशेने कृपशंकर यांची वाटचाल सुरू झाली आहे.