नवी दिल्ली : मध्यप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला १९ जागा मिळाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचे राजकीय वजन वाढले असून, केंद्रात कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
मध्यप्रदेशात यावर्षी मार्चमध्ये ज्योतिरादित्य शिंदे समर्थक २२ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडीनंतर मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार सत्तेवरून दूर झाले होते. त्यानंतर ज्योतिरादित्य यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिक्त जागांवर पोटनिवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात भाजपला मोठे यश मिळाले आहे.
पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी अनेक सभा घेत प्रचार केला. त्यामुळे भाजपच्या जागा वाढल्या आणि आज भाजपची सभागृहातील संख्या १२६ वर पोहोचली आहे. त्यामुळे कमलनाथ यांचे पुन्हा परतणे अथवा मध्यावधीची शक्यता संपुष्टात आली आहे.