नवी दिल्ली : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आॅस्कर फर्नांडिस या काँग्रेस नेत्यांनी सन २०११-१२ या करनिर्धारण वर्षासाठी दाखल केलेल्या प्राप्तिकर रिटर्नची फेरतपासणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागास मुभा दिली.प्राप्तिकर विभागाने अशी फेरतपासणी करण्याची नोटीस दिल्यावर या तिन्ही नेत्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,याचिका गेल्या १० सप्टेंबरला फेटाळली गेल्याने या तिघांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. रिटर्नची फेरतपासणी केली तरी तूर्तास त्यावर पुढील कारवाई केली जाऊ नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले.प्राप्तिकर विभागाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अशा प्रकारे सशर्त मुभा दिली जाण्यास विरोध केला. मात्र, खरं तर हा आदेश निरुपद्रवी आणि तुमच्या फायद्याचाच आहे, असे मेहता यांना सांगून न्या. सिक्री यांनी तो बदलण्यास नकार दिला. अपिलावरील पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी ठेवण्यात आली.या तिन्ही नेत्यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’च्या संदर्भात केलेल्या व्यवहारांवरून प्राप्तिकर विभागाने त्यांच्या रिटर्नची फेरतपासणी करण्याचे योजले आहे.
सोनिया, राहुल गांधी यांच्या प्राप्तिकर रिटर्नची फेरतपासणी करण्याची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:33 AM