काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममध्ये आहे. परंतु या राज्यात राहुल गांधींच्या यात्रेला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सायंकाळी उशिरा नागावच्या अंबागन भागात लोकांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. यावेळी जमावाने 'राहुल गांधी गो बॅक'च्या घोषणा दिल्या. भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी एका दुकानात दिसत आहेत, दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. लोक त्याच्या विरोधात घोषणा देत होते. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राहुल गांधींना तेथून दूर नेले. आंदोलकांच्या हातात पोस्टर आणि बॅनर होते.लोकांनी न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले होते.
या घटनेपूर्वी राहुल गांधींनी नागावमध्ये एका सभेला संबोधित केले होते. आसाममधील भारत जोडो न्याय यात्रेच्या लोकांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप राहुल यांनी केला. ते म्हणाले की, २०-२५ भाजपा कार्यकर्ते आमच्या बससमोर काठ्या घेऊन आले आणि मी बसमधून बाहेर आल्यानंतर ते पळून गेले. काँग्रेसलाभाजपा आणि आरएसएसची भीती वाटते असं त्यांना वाटत होते. परंतु ते स्वप्न पाहत आहेत. ते कदाचित अश्रू ढाळतील. त्यांनी हवे तेवढे पोस्टर आणि बॅनर लावू शकतात, आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा आसामच्या मुख्यमंत्र्यांना घाबरत नाही असं त्यांनी इशारा दिला.
आज सोनितपूरमध्ये जमावाने राहुल गांधींची बस अडवली होती. यावेळी उपस्थित लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत होते. काहींच्या हातात भाजपाचे झेंडेही होते. राहुल गांधी बसमधून खाली आले असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी राहुल गांधींना आत बसमध्ये बसवले. सोनितपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या वाहनांवर जमावाने हल्ला केला, भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेत्याने सांगितले की, आम्ही पोलिसांना कळवले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी आले होते. जयराम रमेश यांच्या गाडीवरून काँग्रेस जोडो न्याय यात्रेचे स्टिकर फाडण्यात आले असून हल्लेखोरांनी कारवर भाजपचा झेंडा लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे कारची मागील काच जवळपास तुटली.