विरोधक मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत; १६ पक्षांचे २० नेते मणिपूरला जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 09:07 PM2023-07-28T21:07:33+5:302023-07-28T21:10:13+5:30
२० खासदारांमध्ये १ मराठी नेता; पाहा यादीतील नावे
Manipur Violence, INDIA alliance: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विरोधक केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता I.N.D.I.A. आघाडीकडून १६ पक्षांचे २० नेते जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मणिपूरला जाणाऱ्या २० नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली असून हे सर्व नेते उद्या आणि परवा मणिपूरमध्ये असतील.
२० नेत्यांमध्ये १ मराठी खासदार!
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई, जेडीयूचे राजीव रंजन सिंग, टीएमसीच्या सुष्मिता देव, डीएमकेच्या कनिमोझी कुरुणानिधी, सीपीआयचे संतोष कुमार, सीपीआयएमचे एए रहीम, आरजेडीचे मनोज झा, सपाचे जावेद अली खान, माही अली खान यांचा समावेश आहे. या नेत्यांशिवाय, विरोधी यादीत राष्ट्रवादीचे पीपी मोहम्मद फैजल, जेडीयूचे अनिल प्रसाद हेगडे, आययूएमएलचे ईटी मोहम्मद बसीर, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन, आपचे सुशील गुप्ता, शिवसेनेचे ठाकरे गटाचे अरविंद सावंत, डी रविकुमार आणि व्ही.चे थॉल थिरुमावलावन यांचाही समावेश आहे. तर आरएलडीचे जयंत सिंह आणि काँग्रेसच्या फुलो देवी नेताम यांच्या नावांचाही समावेश आहे.
१० खासदार राज्यपालांची घेणार भेट
काँग्रेस खासदार नसीर हुसेन यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की उद्या विरोधकांच्या आघाडीचे एक शिष्टमंडळ मणिपूरच्या डोंगरी आणि खोऱ्यातील हिंसाचारग्रस्त लोकांसाठी उभारण्यात आलेल्या मदत शिबिरांना भेट देणार आहे. आम्ही त्यांना हेच सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व काही करू. रविवारी आघाडीचे १० खासदारही राज्यपालांची भेट घेणार आहेत.
मणिपूर हिंसाचारावर लंडनमध्ये निदर्शने
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात भारतीय वंशाच्या लोकांनी गुरुवारी लंडनमध्ये मूक मोर्चा काढला. 'द वुमन ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया सपोर्ट नेटवर्क'शी संबंधित पुरुष आणि महिलांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर मूक आंदोलन केले. चेहऱ्यावर मास्क घातलेल्या आंदोलकांनी हातात फलकही घेतले होते.