INDIAने बंगळुरुतील बैठकीत काय ठरवले? लोकसभेसाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 07:26 PM2023-07-18T19:26:29+5:302023-07-18T19:27:25+5:30
Opposition Parties Meet in Bengaluru: विरोधकांनी नव्या नावासह अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतल्याचे सांगितले जात आहे.
Opposition Parties Meet in Bengaluru: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी विरोधकांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून २४ विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच विरोधी पक्षांच्या आघाडीला नवे नाव देण्यात आले आहे. या बैठकीनंतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि एनडीएवर घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले.
बंगळुरुत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत आघाडीचे नाव निश्चित करण्यासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बंगळुरूतील विरोधी पक्षांच्या बैठकीत २६ पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असे नाव दिले असल्याची घोषणा करण्यात आली. तर, जागा वाटप आणि इतर मुद्यांसाठी ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी विरोधी ऐक्याची ही बैठक महत्त्वाची
देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी विरोधी ऐक्याची ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीत सर्वानुमते इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स हे नाव आघाडीला द्यायचे ठरले आहे. आधी पंतप्रधान मोदी मित्रपक्षांसोबत बोलतही नव्हते. मात्र आता एकेकाला गोळा करतायत. विरोधकांच्या एकजुटीचा त्यांनी धसका घेतला आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. पुढील बैठकीत समन्वय समितीची बैठक होणार आहे. या समितीत ११ सदस्य असणार आहेत. त्यातील नावांबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे खरगे यांनी सांगितले.
दरम्यान, एनडीए आणि इंडिया यांच्यात लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि India यांच्यात लढत आहे. त्यांची विचारधारा आणि भारत यांच्यातील संघर्ष आहे. आम्ही एक कृती आराखडा तयार करू आणि एकत्रितपणे आम्ही देशात काय करू इच्छितो हे सांगणार आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशातील विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. आता दुसरी दोन दिवसीय बैठक बंगळूरु येथे संपन्न झाली.