- शीलेश शर्मा नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एक होत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनुसार लहान राजकीय पक्ष समाजवादी पार्टीशी उघड युती करीत आहेत; तर दुसरीकडे काँग्रेस निवडणूकपूर्व युती करायला तयार नाही. परंतु, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने एका निवडणूक रणनीतीनुसार उमेदवार उभे करण्याची योजना बनवली आहे.
काँग्रेस ८० ते १०० जागांवर लक्ष केंद्रीत करीत आहे, म्हणजे जास्तीत-जास्त जागा जिंकता येतील. निवडणुकीनंतर गरज पडल्यास पक्ष सरकार बनविण्यासाठी सपाला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल. जवळपास ३०० जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करील. त्याचा प्रयत्न असेल की काँग्रेस उमेदवार कमकुवत असेल, तर त्याचा लाभ समाजवादी पार्टी घेऊ शकेल.
मोठे नेतेही उमेदवार
काँग्रेस निवडणुकीत पक्षाच्या मोठ्या नेत्यांनाही उतरवण्याची तयारी करीत आहे. म्हणजे ज्या ८० ते १०० जागांवर लक्ष केंद्रित केले आहे, ते उमेदवार जिंकावेत. या जागांवर सपा असे उमेदवार देईल की जे काँग्रेस उमेदवारांचे नुकसान करू शकणार नाहीत.