विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:57 AM2024-07-04T07:57:32+5:302024-07-04T07:58:24+5:30
विरोधकांनी धोकादायक पायंडा पाडला; शपथेचा अनादर केला असं राज्यसभेचे सभापती यांनी म्हटलं तर खोटे बोलणे, दिशाभूल करणे ही पंतप्रधानांची सवय झाली आहे असा पलटवार विरोधकांनी केला.
नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग करून विरोधकांनी लोकशाही मूल्यांच्या विरोधात एक धोकादायक पायंडा पाडला, अशी खंत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली.
राज्यसभेच्या २६४ व्या सत्राच्या आपल्या समारोपाच्या भाष्यात धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या हौद्यात येणे हे संसदीय आचारसंहितेचा अपमान असल्याचे म्हटले. “आजचा त्यांचा सभात्याग अत्यंत क्लेशदायक होता. हा एक ऐतिहासिक प्रसंग होता. सहा दशकांनंतर पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत होते. असे असताना विरोधक त्यांच्या संवैधानिक नियमापासून दूर गेले आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधीत धोकादायक पायंडा पाडला,” अशी खंत धनखड यांनी व्यक्त केली.
त्यांनी संविधानाकडे पाठ फिरवली
विरोधकांनी सभात्याग केला नाही, तर प्रतिष्ठेचाही त्याग केला. आज त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली नाही, त्यांनी भारतीय संविधानाकडे पाठ फिरवली. आज त्यांनी माझा आणि तुमचा अनादर केला नाही तर राज्यघटनेसाठी घेतलेल्या शपथेचा अनादर केला आहे. भारतीय राज्यघटनेचा यापेक्षा मोठा अपमान होऊ शकत नाही. या वर्तनामुळे देशातील १४० कोटी जनता दुखावणार आहे. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, त्यांच्या अंतःकरणाचा शोध घ्यावा आणि कर्तव्य बजवावे असा सल्ला त्यांनी दिला.
हे लोक जन्मतःच संविधानाचे विरोधक
खरगे म्हणाले की, भाजपने संविधान बनवलेले नाही. ते संविधानाच्या विरोधात आहेत. मला हा विषय त्यांच्यासमोर सभागृहात मांडायचा होता.
'ऑर्गनायझर'च्या संपादकीयात संविधानात भारतीय काहीही नसल्याचे म्हटले होते. जनसंघ व संलग्न संघटनांनी संविधानाला विरोध करून पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे दहन केल्याचा दावाही खरगे यांनी केला. ते आम्हाला संविधानविरोधी म्हणत आहेत, तर हे लोक जन्मतःच संविधानाचे विरोधक आहेत, असेही ते म्हणाले.