शीलेश शर्मा,नवी दिल्ली- पाच राज्यांतील निवडणुकांच्या प्रचारात सरकारवर जबर हल्ले करणारे विरोधी पक्ष अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्रात सरकारविरोधात पुन्हा एक व्हायच्या तयारीत आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव आणि बँकेच्या बचत खात्यातून रोख पैसे मर्यादेपक्षा जास्त वेळा काढण्यावर १५० रुपये आकारले जाणारे शुल्क या मुद्यावरून विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत. निवडणूक निकालाच्या आधी विरोधकांचा सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न असेल. या मुद्यांशिवाय विद्यार्थ्यांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा निर्माण झालेला वाददेखील विरोधक वापरणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर गुरुवारी काँग्रेसने हल्ला करून या लढाईचे संकेत दिले. मोदी खोटे बोलून देशाला धोका देत आहेत. जीडीपीची खोटी आकडेवारी दिले गेली, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मोदी यांनी देशाची क्षमा मागावी, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मणिपूरमधील भाषणाचा विपर्यास करून मोदी प्रचारसभांत खोटेच सांगत आहेत. याबद्दल मोदींनी काँग्रेसची क्षमा मागावी, असे सूरजेवाला म्हणाले. विरोधकांच्या सामुहिक रणनीतिसाठी ९ मार्च रोजी काँग्रेस, बसप, डावे पक्ष, टीएमसी, द्रमुक, जनता दल (यु) आणि राष्ट्रीय जनता दलसह इतर पक्षांची बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. सरकारवर विरोधक एकत्रच हल्ला करू शकतील, असा त्या मागे विचार आहे.>विकासदराची आकडेवारी ही फसवणूकघरगुती वापराच्या गॅसचे दर वाढल्याबद्दल सूरजेवाला यांनी टीका केली. जो सिलिंडर ४६६ रुपयांत मिळायचा तो आता ७३७ रुपयांना घ्यावा लागत आहे. दोन वर्षांत त्याचा भाव ५८ टक्क्यांनी वाढला. जीडीपीत वाढ झाल्याचे दाखवण्यासाठी अप्रत्यक्ष करांना त्यात समाविष्ट करण्यात आले म्हणजे विकासदर चांगला दिसावा. ही सरळसरळ फसवणूक आहे, असे ते म्हणाले. जर अप्रत्यक्ष करातील २५० कोटी रुपये काढून टाकले तर नोटाबंदीच्या निर्णयाचा जीडीपीवर किती परिणाम झाला आहे हे लक्षात येईल, असे सूरजेवाला यांनी सांगितले.
संसदेत विरोधक येणार एकत्र
By admin | Published: March 03, 2017 4:39 AM