नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेल्या भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत व्हिजन 2022 सादर करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला. विरोधकांकडे नेता, निती आणि रणनिती यापैकी काहीही नसल्याची टीका त्यांनी केली. हताश झालेल्या विरोधकांकडून सध्या नकारात्मक राजकारण सुरू असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव कार्यकारणीनं एकमतानं मंजूर केला. 2022 पर्यंत 'न्यू इंडिया' साकारण्याच्या मुद्द्याचा समावेश या प्रस्तावात आहे. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक करण्यात आलं असून 'न्यू इंडिया'चा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. न्यू इंडियामध्ये ना कोणी गरीब असेल, ना कोणी बेघर असेल, असं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. देशात आज नवनिर्मितीचं वातावरण असल्याची माहिती राजकीय प्रस्तावात असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. देशातील जनता स्वत:ची प्रगती करत देशाच्या विकासात मोठा वाटा उचलत आहेत, असंही ते म्हणाले. यावेळी जावडेकर यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. मोदी हे आजच्या घडीला जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. साडेचार वर्षे सत्तेत राहूनही त्यांची लोकप्रियता 70 टक्के आहे. देशातच काय, जगात याआधी असं कुठेही घडलेलं नाही, असा दावादेखील त्यांनी केला.
विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 3:21 PM