पटना - बिहारमध्ये राज्य सरकारचं अधिवेशन सत्र सुरू असून मंगळवारी चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. सरकारच्या आदेशानंतर सुरक्षा जवानांनी आमदारांना सभागृहातून बाहेर काढताना राडा झाल्याचं दिसून आलं. या झटापटीत अनेक आमदारांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव चांगलेच संतापले असून आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह राजदच्या अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बिहार विधानसभेत मंगळवारी 'विशेष सशस्त्र पोलीस विधेयक 2021' संमत करण्यात आले. या विधेयकास विरोध करताना विरोधकांनी गोंधळ केला, तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हे बिल फाडून अध्यक्षांसमोरच फेकून दिले. तेजस्वी यादव यांनी अशारितीने आपला विरोध दर्शवल्यानंतर इतर आमदारांनीही या विधेयकाला विरोध असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. तसेच, वेलमध्ये येऊन आपला विरोध दर्शवला. त्यानंतर, मोठा गोंधळ उडाल्यामुळे पोलीस जवान आणि सुरक्षा रक्षकांनी हाताला धरुन बळजबरीने आमदारांना सभागृहाबाहेर काढले. त्यावरुन, तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आता तेजस्वी यादव यांच्यासह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पुन्हा एकदा तेजस्वी यादव यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच मारहाण
अति मागास समाजातून आलेल्या आमच्या महिला आमदारांचे केस ओढण्यात आले. आमच्या आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी, जवानांनी हे कृत्य केलं असून आम्ही जेव्हा सभागृहात असतो तेव्हा मुख्यमंत्री सभागृहाबाहेर असतात, असेही यादव म्हणाले. तसेच, एक व्हिडिओ शेअर करत, राजदच्या आमदारांना लोकशाही मंदिरातच मारहाण झाल्याचंही ते म्हणाले. गुंड वृत्तीच्या सरकारच्या गुंडांनी आमदारांना स्ट्रेचरवर जावं लागेल, एवढं बेदम मारलं, रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेलं, असंही यादव यांनी सांगितलं.