भारतात हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन शनिवारी केले होते. मात्र या आवाहनानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे प्रमुख डीएमके स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यातच आता हिंदी भाषेवरुन त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
अमित शहांच्या एक देश, एक भाषा या आवाहनाला पाठिंबा देत बिल्पव देव म्हणाले की, जे लोक हिंदी भाषेला विरोध करत आहेत, त्यांचे देशावर प्रेम नसल्याने त्यांनी विधान केले आहे. मी इंग्रजीचा विरोध करत नाही, तसेच हिंदी भाषा एखाद्यावर लादली पाहिजे असेही माझे मत नाही. मात्र सध्या हिंदी भाषेला ज्या पद्धतीने विरोध करण्यात येत आहे तो न पटण्यासारखा असल्याचे मत बिप्लब यांनी व्यक्त केलं आहे.
हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर मनसेसह भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, असदुद्दीन ओवेसी, कमल हासन आदींनी टीका केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शहा यांच्यावर निशाणा साधत भारतात हिंदीव्यतिरिक्त बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषा हा दुबळेपणा नाही असे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कन्नड भाषेची भलामण केली होती. कन्नड संस्कृती जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे सांगून त्यांनी अमित शहा यांच्या हिंदी लादण्याला विरोध केला होता. तसेच द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी अमित शहांनी हिंदी भाषेवरुन केलेल्य़ा विधानांचा आम्ही विरोध करत राहू असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शनिवारी 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी म्हटले होते.