काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी अपात्रतेवरुन आज दिल्लीत विरोधी पक्षांनी एकत्र येत निदर्शने केली. तसेच अदानी समूहाशी संबंधित प्रकरणात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला. विरोधी पक्षनेत्यांनी आधी संसदेच्या संकुलात ठिय्या मांडला आणि नंतर विजय चौकापर्यंत मोर्चा काढला.
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. यात काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अनेक खासदार, डीएमकेचे केटीआर बाळू, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे नेते उपस्थित होते. एनके प्रेमचंद्रन आणि इतर काही नेते उपस्थित होते.
यावेळी सर्व खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केल्यानंतर विरोधी विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. त्यांनी हातात एक मोठा बॅनर घेतला होता ज्यावर 'सत्यमेव जयते' लिहिले होते. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.
तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनर्जी हेही या मोर्चात सहभागी झाले होते. १८ विरोधी पक्षांच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते. प्रदीर्घ काळानंतर काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीत आणि निदर्शनात तृणमूल काँग्रेस सहभागी झाली नव्हती पण आजच्या बैठकीत सहभाग घेतली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी राहुल गांधींच्या अपात्रतेच्या निषेधार्थ आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल विरोधी पक्षांचे आभार मानले.'आम्ही काळे कपडे घालून आलो आहोत कारण मोदीजी देशातील लोकशाही नष्ट करत आहेत हे दाखवायचे आहे. आधी स्वायत्त संस्था संपुष्टात आणल्या आणि मग धमक्या देऊन सगळीकडे सरकारे बनवली आणि मग जे नमते नाहीत, त्यांना ईडी आणि सीबीआयचा वापर करून धमकावण्याचा प्रयत्न झाला आणि आता हा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकाही मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.