“वायनाडमधून नाही, राहुल गांधींनी युपीतून निवडणूक लढवावी”; INDIA गटातील नेत्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:44 PM2023-12-05T18:44:29+5:302023-12-05T18:47:15+5:30
Opposition INDIA Alliance: उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही. त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले, अशी टीका इंडिया आघाडीतील एका नेत्याने केली आहे.
Opposition INDIA Alliance: पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच विरोधकांच्या इंडिया आघाडीची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच आता विरोधकांच्या आघाडीत सामील असलेल्या एका पक्षाच्या नेत्याने एक सल्ला दिला आहे. वाडनाडमधून नाही, तर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी, असे म्हटले आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीत सामील असलेले पक्ष काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी दक्षिण भारतात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे हिंदी पट्ट्यात काँग्रेसची पकड कमकुवत होऊ लागली आहे, असे दावा करत, सीपीएम नेते एमव्ही गोविंदन यांनी राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळमध्ये भाजप नाही. राहुल गांधींनी एलडीएफ विरोधात नव्हे तर भाजपविरोधात निवडणूक लढवावी, असा सल्ला गोविंदन यांनी दिला आहे.
राहुल गांधींनी वायनाडमधून पुढची निवडणूक लढवू नये
कॉमन सेंस असलेली कोणतीही व्यक्ती सांगेल की, आता राहुल गांधींनी वायनाडमधून पुढील निवडणूक लढवू नये. असे केल्यास काँग्रेसची हिंदी बहुल भागातील पकड कमकुवत होईल. पुन्हा केरळमधून निवडणूक लढवली, तर राहुल गांधींना भाजपविरोधात नाही तर डाव्या पक्षांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा संकेत जाईल, असा तर्क गोविंदन यांनी मांडला आहे. असे ते म्हणाले. गेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली होती आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला होता.
दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सीपीएमसह अनेक पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. केरळमध्ये मुस्लिम लीगने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसला काही करता आले नसते. उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही आणि त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले आहे. यावरून हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसचा तितकासा प्रभाव नाही, हे स्पष्ट होते, असेही गोविंदन यांनी म्हटले आहे.