नवी दिल्ली: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी पीएम मोदी आज(1 ऑगस्ट) पुण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हेदेखील मोदींसोबत मंचावर उपस्थित होते. यावरुन AIMIM प्रमुख असदुद्दी ओवेसी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आज पुण्यात झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंचावर, शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी पीएम मोदी पवारांना भेटल्यानंतर दोघांमध्ये चांगला संवाद झाला. पवारांनी यावेळी मोदींच्या पाठीवर थापही मारली. विशेष म्हणजे, पवारांनी मोदींसोबत एका मंचावर येणे, इंडिया आघाडीतील नेत्यांनाही आवडले नाही. यातच आता असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटमध्ये पवारांवर हल्लाबोल केला आहे.
ओवेसी यांनी पवार आणि मोदींचा फोटो शेअर करत लिहिले की, 'लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावरुन आंदोलन करत आहेत आणि शरद पवार पुण्यात नरेंद्र मोदींसोबत आनंदाने स्टेज शेअर करत आहेत. हा कसला दांभिकपणा आहे? कोणत्याही चर्चेविना विधेयक सभागृहात मंजूर करुन घेतल्याने भाजप आनंदात आहे,' अशी टीका ओवेसी यांनी यावेळी केली.