opposition meeting in bangalore | बंगळुरू : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. बिहारची राजधानी पाटणा येतील बैठकीनंतर बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी बैठक होत आहे. या बैठकीला देशभरातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाप्रणित NDA असो अथवा काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA. विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली असून त्यांचा सोनिया गांधींसोबत चर्चा करत असतानाचा फोटो समोर आला आहे.
विरोधकांच्या बैठकीतील काही फोटो शेअर करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले. "भारतातील विविध राजकीय विचारधारा आणि प्रदेशातील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्वोच्च देशभक्तीपर कर्तव्य बजावले आहे. आपल्या संविधानाचे आणि आपल्या लोकशाहीचे रक्षण करणे हेच हे कर्तव्य आहे", असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
तसेच भारतातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणू पाहणाऱ्या दिल्लीश्वरांविरुद्ध भारतभरातील महत्वाच्या सर्व पक्षांची एकी झाली असून त्या संबधातील महत्वाच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ह्यांच्यासोबत मी काल बंगळुरु येथे दाखल झालो. आजही देशभरातील महत्वाच्या नेत्यांशी दिवसभर येथे चर्चा होत असून लोकशाही वाचवण्यासाठी जे जे महत्वाचे आहे ते सर्व आम्ही करू. देशाला हुकूमशाहीच्या विळख्यातून बाहेर काढू, असेही ठाकरेंनी सांगितले. आगामी लोकसभेसाठी विरोधकांची रणनीती अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने विजय मिळवून भाजपाला सत्तेतून बाहेर फेकले. याशिवाय हिमाचल प्रदेशातही कॉंग्रेसने विजय मिळवला. आगामी काळात मध्य प्रदेश, राजस्थान इथेही निवडणूक आहे. काँग्रेसची तिथेही जोरदार तयारी सुरू आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येत तडजोड करण्यास तयार आहे. त्यासाठी सोनिया गांधी देखील बंगळुरूत होत असलेल्या बैठकीत सहभागी झाल्या आहेत. या बैठकीत महत्त्वाचा प्रश्न असा की, विरोधी पक्षांची एकजूट २०२४ ला मोदींना हरवू शकेल का? विरोधकांची एकजूट निवडणुकीत टिकेल का? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज बंगळुरूत विरोधकांच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.