Bihar Opposition Parties Meeting: उद्या म्हणजेच 23 जून, देशाच्या राजकारणासाठी मोठा दिवस आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काय करावे, यावर चर्चा करण्यासाठी बिहारच्या पाटण्यात विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत मोदी सरकारविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्यावरही चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधकांचे नेतृत्व कोण करेल? याऐवजी भाजपविरोधात रणनिती आखण्यावर चर्चा केली जाणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, सीपीआय नेते डी राजा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसह अनेक नेते या पहिल्या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
ही फक्त सुरूवात आहे...या बैठकीचे आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला घेरण्यासाठी विरोधी एकजुटीची सुरुवात म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. यात जागावाटप आणि नेतृत्वाशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाईल आणि फक्त विरोधी एकजुटीवर चर्चा केली जाईल. ही तर फक्त सुरुवात आहे, यापुढेही अशाप्रकारच्या बैठका घेतल्या जातील, अशी माहिती समोर आली आहे.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चाभाजपला कोंडीत पकडण्यासाठी कोणते मुद्दे उपस्थित करायचे, हा या बैठकीचा सर्वोच्च अजेंडा असेल. मणिपूर हिंसाचार आणि केंद्राचे अपयश अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आपापसातील मतभेद विसरुन तृणमूल काँग्रेस, आप आणि काँग्रेस या बैठकीत हजर राहणार आहेत. त्यामुळेच या बैठकीकडे सत्ताधाऱ्यांसह देशातील नागरिकांचेही लक्ष लागून आहे.
या पक्षांची बैठकीकडे पाठभाजपविरोधात आघाडी उभारण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे. यात अनेक भाजपविरोधी पक्ष सामील होणार आहेत. पण, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती, ओडिशातील बिजू जनता दल, बहुजन समाज पक्ष, कर्नाटकातील जनता दल सेक्यूलर, पंजाबमधील अकाल दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पार्टीसह इतर अनेक पक्षांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे.