नवी दिल्ली - बुधवारी लागलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये दोन जागा गमावणाऱ्या भाजपाला अजून एक धक्का देण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. पोटनिवडणुकांमधील सततच्या पराभवांमुळे लोकसभेतील संख्याबळ घटलेल्या मोदी सरकारविरोधात शुक्रवारी लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याची मागणी करणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून मोदी सरकारविरोधात हा अविस्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या अविश्वास प्रस्तावाला तेलगू देसम पक्षाचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे खासदार वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा मबासचिवांकडे निवेदन दिले आहे. तसेच हा विषय शुक्रवारच्या कामकाजामध्ये समाविष्ट करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सुब्बा रेड्डी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेटही घेतली आहे. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी असलेल्या तेलगू देसम पक्षाने या अविश्वास प्रस्तावास आवश्यता भासल्यास पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.