विरोधी खासदारांवर सर्वात मोठी कारवाई; संसदेत कोणत्या पक्षाचे किती खासदार उरले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 09:42 PM2023-12-20T21:42:23+5:302023-12-20T21:43:28+5:30
Opposition MPs Suspend: आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतून 143 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
Oppostion MPs Suspend: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसद सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. यावरुन विरोधक सातत्याने गदारोळ घालत आहेत. या गदारोळामुळे 140 हून अधिक लोकसभा-राज्यसभा खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज, बुधवारी (20 डिसेंबर) सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी दोन खासदारांना निलंबित केले. यामध्ये काँग्रेसच्या सी थॉमस आणि सीपीआयएमच्या एएम आरिफ यांचा समावेश आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 143 झाली आहे. त्यापैकी 97 खासदार लोकसभेचे आहेत, तर 46 खासदार राज्यसभेचे आहेत. सर्वप्रथम 14 डिसेंबर रोजी लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील 1 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर 18 डिसेंबर रोजी लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. हा क्रम इथेच थांबला नाही, 19 डिसेंबरलाही आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले.
बहुतांश निलंबित खासदार काँग्रेसचे
लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सभागृहांतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आहेत. काँग्रेसच्या एकूण 57 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे, त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक आहे.
कोणत्या पक्षाचे किती खासदार लोकसभेतून निलंबित?
लोकसभेबद्दल बोलायचे झाले तर संसदेच्या कनिष्ठ सभागृहातून एकूण 97 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या एकूण 38 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. आता लोकसभेत पक्षाचे फक्त 10 सदस्य आहेत. तर, द्रमुकचे 16 खासदार आणि 13 टीएमसी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. जेडीयूच्या 16 पैकी 11 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
याशिवाय, CPIM, IUML आणि NCP (शरद पवार) पक्षाच्या प्रत्येकी तीन खासदारांना निलंबित केले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी दोन खासदार, आम आदमी पार्टी, सीपीआय, आरएसपी, व्हीसीके आणि केरळ काँग्रेसचे प्रत्येकी एका खासदारावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
राज्यसभेतील निलंबित खासदार
राज्यसभेबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेसचे 19, टीएमसीचे 8, डीएमकेचे 5, सीपीआयएमचे 3, सपा, जेडीयू आणि सीपीआयचे प्रत्येकी 2 खासदार निलंबित करण्यात आले आहेत. यासोबतच राजद, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), केरळ काँग्रेस, झामुमो आणि अंचलिक गण मोर्चाच्या प्रत्येकी एका खासदारावर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या किती खासदार शिल्लक ?
सध्या लोकसभेत काँग्रेसचे 10 खासदार, द्रमुकचे 8, टीएमसीचे 9, शिवसेना 6, जेडीयू 5, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, जेएमएम, सीपीआय आणि सपा यांचे प्रत्येकी एक खासदार शिल्लक आहेत. तर, राज्यसभेत काँग्रेसचे 11, टीएमसी, आरजेडी आणि डीएमकेचे प्रत्येकी 5, सीपीआयएम आणि एनसीपीचे 2, जेएमएम, आययूएमएल आणि आरएलडीडीचे प्रत्येकी 1, आम आदमी पक्षाचे 10 शिवसेना आणि जेडीयूचे प्रत्येकी 3-3 खासदार शिल्लक आहेत.