DMK MP Suspension Issue: संसदेच्या सुरक्षेतील गंभीर चुकीवरुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, विरोधकांनी यावर राजकारण करू नये, असे सरकारचे स्पष्ट म्हणणे आहे. पण, अधिवेशनच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील 1 विरोधी खासदाराला उर्वरित अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.
यापूर्वी या यादीत 14 लोकसभा खासदारांची नावे होती. मात्र, नंतर द्रमुक खासदार एसआर पार्थिबन (SR Parthiban) यांचे निलंबन मागे घेण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, आज निलंबित लोकसभा सदस्यांच्या यादीतून पार्थिवन यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. एसआर पार्थिबन यांची ओळख पटवण्यात कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचा टोमणा
या निर्णयावर विरोधी पक्षांनी खरपूस समाचार घेतला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश म्हणाले की, 'काल लोकसभेत जे घडले ते अतिशय चिंताजनक आहे. आज लोकसभेत जे घडले ते अत्यंत विचित्र आहे. तामिळनाडूतील खासदार, जो सभागृहात उपस्थित नव्हता आणि प्रत्यक्षात नवी दिल्लीबाहेर होता, त्यालाही कामकाजात अडथळा आणल्याबद्दल निलंबित करण्यात आले. आरोपींनी ज्या खासदाच्या मदतीने सभागृहात प्रवेश केला, त्या भाजप खासदारावर कोणतीही कारवाई केली नाही.'
कोणत्या खासदारांना निलंबित करण्यात आले?
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला होता. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतरही गदारोळ थांबला नाही, म्हणून लोकसभा अध्यक्षांनी आणखी 9 सदस्यांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले. यामध्ये बेनी बेहानन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोझी, व्हीके श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे.