अमरावती : आगामी निवडणुकांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम)चा वापर करू नये यासाठी काही विरोधी पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी सांगितले.मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या १५ विरोधी पक्षांच्या बैठकीत ईव्हीएमबाबतचा कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र त्याचा तपशील चंद्राबाबू नायडू यांनी सांगितला नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्याऐवजी मतपत्रिकांचा वापरकरावा अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे.त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. मात्र ईव्हीएमचा वापर करण्यावर केंद्रीय निवडणूक आयोग ठाम आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, बहुतेक राजकीय पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. मात्र काही पक्ष राजकीय हेतूंपायी ईव्हीएमला लक्ष्य करत आहेत. (वृत्तसंस्था)
ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष जाणार सुप्रीम कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:31 AM