एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे विरोधी पक्षांची अस्वस्थता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:49 AM2019-05-20T10:49:09+5:302019-05-20T10:49:42+5:30
एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची मतदान प्रकिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज फेटाळून लावले आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.
एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला देण्यात कमीत कमीत जागांचा विचार केला तरी विरोधकांचे आघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसत नाही, त्यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला सर्वाधिक जागा दाखवण्यात आल्यानंतर काँग्रेसने हे अंदाज म्हणजे निव्वळ कल्पनाविस्तार आहे, असे म्हटले आहे. 23 मे रोजी येणारा खरा निकाल सत्ताधारी पक्षाला धक्का देणारा असेल, असा दावा काँग्रेसने केला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजांची खिल्ली उडवली आहे. हे अंदाज म्हणजे निवळ गॉसिप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 'एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनीतीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो', असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
I don’t trust Exit Poll gossip. The game plan is to manipulate or replace thousands of EVMs through this gossip. I appeal to all Opposition parties to be united, strong and bold. We will fight this battle together
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 19, 2019
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलमधील अंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्झिट पोल जनतेच्या मनाचा कानोसा घेण्यास अपयशी ठरले आहेत. हे एक्झिट पोल चुकीचे ठरतील, कारण जमिनीवरील वास्तव वेगळेच आहे. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि केंद्राता गैरभाजपा सरकार बनेल, असा दावा नायडू यांनी केला आहे.
Time and again exit polls have failed to catch the People's pulse. Exit polls have proved to be incorrect and far from ground reality in many instances. While undoubtedly TDP govt will be formed in AP, we are confident that non-BJP parties will form a non-BJP govt at the center.
— N Chandrababu Naidu (@ncbn) May 19, 2019
जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रात भाजपा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांना अजून, 2004 प्रमाणे निकाल लागण्याची अपेक्षा आहे. 2004 मध्ये केंद्रात वाजपेयी सरकास पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. तसेच काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनून डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.
मात्र एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. निवडणुकीनंतर करण्यात आलेले एक्झिट पोल आणि पक्षाने घेतलेल्या अंतर्गत सर्वेचे आकडे सारखेच असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाने केलेल्या सर्वेनुसार गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ज्या राज्यांत विजय मिळवला होता. त्या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झालेली नाही. तसेच एनडीएने 230 पेक्षा अधिक जागा मिळवल्यास त्यांना सत्तेत येण्यापासून रोखणे कठीण होणार आहे. मात्र एनडीएला 230 पेक्षा कमी जागा मिळाल्यास काँग्रेसला किती जागा मिळतात यावर पुढील सत्तासमिकरण अवलंबून असेल.