नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची मतदान प्रकिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज फेटाळून लावले आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला देण्यात कमीत कमीत जागांचा विचार केला तरी विरोधकांचे आघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसत नाही, त्यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला सर्वाधिक जागा दाखवण्यात आल्यानंतर काँग्रेसने हे अंदाज म्हणजे निव्वळ कल्पनाविस्तार आहे, असे म्हटले आहे. 23 मे रोजी येणारा खरा निकाल सत्ताधारी पक्षाला धक्का देणारा असेल, असा दावा काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजांची खिल्ली उडवली आहे. हे अंदाज म्हणजे निवळ गॉसिप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 'एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनीतीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो', असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे विरोधी पक्षांची अस्वस्थता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:49 AM