पहिल्याच बैठकीनंतर विरोधी ऐक्यात फूट; AAP चा आगामी बैठकांमध्ये सामील होण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:04 PM2023-06-23T19:04:35+5:302023-06-23T19:07:05+5:30
आज 16 भाजपविरोधी पक्ष बिहारच्या पाटण्यात एकत्र आले. यावेळी सर्वांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यावर चर्चा झाली.
Opposition Parties Meet: आज देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. आज 16 भाजपविरोधी पक्ष बिहारच्या पाटण्यात एकत्र आले. यावेळी सर्वांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यावर चर्चा झाली. भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच इतके विरोध एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या पहिल्या बैठकीनंतर लगेच विरोधकांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे.
विरोधी ऐक्याला मोठा धक्का?
जोपर्यंत दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला काँग्रेस जाहीरपणे विरोध करत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही आगामी बैठकीत सहभागी होणार नाही, असे पक्षाने जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस आणि आप यांच्यात जोरदार वादही झाला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका विचारली.
काय आहे अध्यादेशाचा वाद?
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना कायदा आणि सुव्यवस्था, जमीन आणि पोलीस वगळता बाकीचे सर्व अधिकार दिल्ली सरकारकडेच राहतील, असे स्पष्ट केले होते. अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा अधिकारही दिल्ली सरकारला देण्यात आला होता. मात्र त्या निर्णयानंतर केंद्र सरकारने अध्यादेश आणल्याने अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा अधिकार पुन्हा दिल्ली सरकारकडून हिसकावण्यात आला. काँग्रेस वगळता 11 विरोधी पक्षांनी अध्यादेशाविरोधात आपला पाठिंबा दिला आहे.