आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पाटणा येथे १२ जून रोजी होणारी विरोधी पक्षांची ऐक्याची बैठक तूर्तास स्थगित करण्यात आली असून, ही बैठक या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वतीने सांगण्यात आले होते की, १२ तारखेला होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहू शकत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचा कार्यक्रम आधीच ठरलेला असून, राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी दि. २० जूननंतर भारतात परतणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासोबत नियमित तपासणीसाठी विदेशात गेलेल्या आहेत.
राहुल गांधी हे त्यांचा अधिकृत कार्यक्रम संपल्यानंतर सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि सीताराम येचुरी यांनीही व्यस्ततेमुळे बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
बैठक हाेणार या महिन्याच्या अखेरीस
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी यापूर्वीच सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले होते. तीन मोठ्या पक्षांच्या अनुपस्थितीत विरोधी ऐक्याची पहिली बैठक होणे, या दोन्ही नेत्यांना मान्य नाही. त्यामुळेच विरोधी पक्षांतील सर्व मोठ्या नेत्यांच्या सहमतीने ही बैठक तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. आता या महिन्याच्या अखेरीस पाटणा येथे बैठक होणार आहे.