विरोधी पक्षांची पुढील बैठक बंगळुरूत, सोनिया गांधी उपस्थित राहणार, खरगेंनी पाठवले निमंत्रण पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:21 AM2023-07-12T11:21:19+5:302023-07-12T11:32:42+5:30
या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.
बंगळुरू : पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. पाटण्यानंतर आता विरोधी पक्षांची पुढील बैठक १७ आणि १८ जुलै रोजी होणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची एकता बैठक आहे. या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आठ नवीन पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधी आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात बिहारच्या पाटणा येथे झालेल्या मेगा विरोधी बैठकीनंतर २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते बंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
यामध्ये मरुमलारची द्रविड, मुनेत्र कळघम (एमडीएमके), कोंगू देसा मक्कल काची (केडीएमके), विदुथलाई चिरुथिगल काची (वीसीके), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणि) हे नवीन राजकीय पक्ष आहेत, जे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होणार आहेत. दरम्यान, केडीएमके आणि एमडीएमके हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सहयोगी पक्ष होते, परंतु आता ते विरोधी पक्षांमध्ये सामील झाले आहे. या बैठकीसाठी या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे सर्व श्रेय काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना दिले जात आहे.
विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षांनी त्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीत आपल्या सहभागाची आठवण करून दिली. मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की, पाटणा बैठक एक मोठे यश आहे, कारण आम्ही आमच्या लोकशाही राजकारणाला धोक्यात आणणार्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकलो आणि पुढील सार्वत्रिक निवडणूक एकजुटीने लढण्याचे एकमताने सहमत केले.
आम्ही जुलैमध्ये पुन्हा भेटण्याचे ठरवले आहे, याची आठवण काँग्रेस अध्यक्षांनी नेत्यांना करून दिली. पत्रात पुढे म्हटले आहे की, मला वाटते की, या चर्चा पुढे सुद्धा चालू ठेवणे आणि आम्ही तयार केलेली गती वाढवणे महत्वाचे आहे. आपला देश ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्यावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे. मी तुम्हाला १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती करतो.