शरद पवार इन अॅक्शन! उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक; 'मिशन २०२४'चा प्लान तयार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 15:19 IST2021-06-21T14:48:10+5:302021-06-21T15:19:14+5:30
उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची मोठी बैठक; काँग्रेसच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह

शरद पवार इन अॅक्शन! उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक; 'मिशन २०२४'चा प्लान तयार?
नवी दिल्ली: शस्त्रक्रियनंतर सक्रिय झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
गेल्या दोन आठवड्यांत शरद पवार यांनी दोनदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. याआधी मुंबईतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पवार आणि किशोर यांची भेट झाली होती. आता उद्या पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्षासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू
तृणमूलचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच नावानं एक व्यासपीठ सुरू केलं आहे. याच राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली उद्या शरद पवार आणि विरोधकांची बैठक होत आहे. या नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यै बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी किंवा नेता उपस्थित राहणार आहे की नाही, याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यूपीए की तिसरी आघाडी?
शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचं नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेआधी भाजपविरोधात महाआघाडीची गरज असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं.