Opposition Protest In Parliament: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवशनात उमटत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची मागणी करत आहेत. या मागणीमुळे अधिवेशनात प्रचंड गदारोळ सुरू असून, एक दिवसही योग्यरित्या कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, आज विरोधी पक्षाचे खासदार काळे कपडे घालून संसदेत पोहोचले आहेत. यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
ज्यांचे मन काळे...काळे कपडे घालून संसदेत पोहोचलेल्या विरोधी खासदारांबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, 'ज्यांचे मन काळे आहे, त्यांच्या हृदयात आणखी काय असणार. यांचे मन काळे, यात काळा पैसा लपवला आहे का? यांचे नेमके काय कारनामे आहेत, जे यांना दाखवायचे नाहीत. गंभीर विषयाचे राजकारण केले जात आहे. हा भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे. काळे कपडे घालणाऱ्या लोकांना देशाची वाढती ताकद समजत नाहीये.'
भवितव्यही काळेचगोयल यांनीही आपल्या भाषणात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यावर संसदेच्या आवारात कावळ्याने हल्ला केल्याच्या घटनेचा उल्लेख केला आणि खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'आजकाल काळे कावळेही त्यांच्याकडेच आकर्षित होत आहेत. त्यांचा भूतकाळ काळा होता, वर्तमान काळा आहे आणि भविष्यही काळेच राहणार. आम्ही नकारात्मक विचारांचे लोक नाही. त्यांच्या जीवनातील अंधारही संपून जीवन प्रकाशमान होईल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. काळे कपडे, काळे काम, भारत खपवून घेणार नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पियुष गोयल यांच्या भाषणानंतर एनडीएच्या सर्व खासदारांनी काळे कपडे, काळे काम, भारत खपवून घेणार नाही, अशा घोषणा दिल्या. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनीही घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूंनी होणारी जोरदार घोषणाबाजी पाहता अध्यक्ष जगदीप धनखड सर्व खासदारांना गप्प बसवताना दिसले. यानंतर गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.